शनिवार, २८ ऑक्टोबर, २०१७

रात्र


रात्र तशी बरीच झाली होती. टे दोघजण रस्त्यावर एकटेच हिंडत होते. दोघाही जण एकमेकांशी एक शब्द पण बोलत नव्हते. जणू त्या आवाजाने रात्रीची संपूर्ण शांतता भंग होईल.

बाहेरून बघणार्याला वाटेल कि ती आपल्याच विहारात चाललीये. तो मात्र सतत तिच्यावर नजर ठेवून होता. रात्री एकत्र चालताना डोळ्यात डोळे घालून पहायची हिम्मत नाही होत. अगदी एकटे असलो तरी. ती रात्र आपल्यापुढे आ वासून उभी असते आणि समोरच्याच्या सोल्यात पाहिल्यावर ना जाणो खरं बाहेर पडेल ह्याची भीती घालत असते. बोलायचं असलं तरी शांततेत, सगळा संवाद नुसता डोक्यात.

दिवसभरात काय काय झालं, कोण कोणाला आज काय म्हणालं, माझा बॉस कसा माथेफिरू आहे, त्या शेजारच्या ऑफिस मधले कायम कसे पार्टी करत असतात, एक ना अनेक असे सगळे विषय संध्याकाळीच बोलून झाले होते. संध्याकाळची वेळच तशी रोमांटीक, हातात हात घेऊन, एकमेकांच्या डोळ्यात बुडत जात छान बोलत बसण्याची. संध्याकाळचा एकटेपणा कंटाळवाणा; तशी रात्र मात्र पक्की; ती फक्त स्वतःची.

रात्रीला स्वतःच एक अंग आहे. रात्रीला एकटेपणा आवडतो, पण ती एकलकोंडी नाही, तिला बोलायला शब्दांची गरज नाही पडत. तिच्यात स्वतःचा असा एक वेगळाच रोमान्स आहे. नाईट आउटला आपण कितीही गप्पा मारायचा ठरवलं तरी शेवटी रात्र तुम्हाला शांत करते, पुढच्या गप्पा फक्त रात्र करते; शब्द प्रत्येकासाठी वेगळे, ज्याचे त्यालाच कळतात.


आता रस्त्यावरून जाताना तिने त्याच्याकडे फक्त एक कटाक्ष टाकला, त्याने मुद्दाम तिच्याकडे दुर्लक्ष केलं. आता मात्र ती त्याला रागवायला म्हणून तोंड उघडणार म्हणून तिने परत त्याच्याकडे पाहिलं,पण रात्रीने सगळे शब्द खावून टाकले होते. आता मात्र त्याच्या लक्षात आलं आणि त्याने पण तिच्याकडे एक मिश्कील नजर टाकली. सगळा संवाद त्या एका कटाक्षामधेच झाला. तिची खोली आली होती. त्याने हसून पुढचा प्रवास चालू केला.