शनिवार, २८ मार्च, २०२०

क्षण

तो तिच्यासाठी सगळं करायचा. आजपर्यंत त्याने तिचा शब्द खाली पडू दिला नव्हता. त्या एका शब्दासाठी जणू तो जगत होता. लोकं प्रेमात वेडे होतात असं ऐकलं होतं. इकडे तो प्रेमात वेडा होऊन आंधळा झाला होता. तिच्यासाठी डोळे झाकून निर्णय घ्यायचा तो.

ती पण त्याला वाटेल ते हक्काने मागायची. पण तिचा स्वभाव थोडं वेगळा होता. तिला प्रत्येक गोष्ट बोलायची सवय नव्हती. ती स्वतःच्याच विश्वात मश्गुल असायची. कधी कधी त्या नादात ती त्याला पण विसरून जायची.

त्याच्या आजूबाजूचे तिच्याबद्दल काहीबाही भरवायला लागले होते. ती तुझा वापर करतेय, मुली अश्याच असतात रे, तिला फक्त तुझा पैसा दिसतोय, एवढा भाव नसतो रे द्यायचा मुलींना वगैरे वगैरे, एक ना अनेक. सगळीकडून तिच्याबद्दलच्या वाईट साईट गोष्टींचा त्याच्यावर मारा चालला होता. पण अजून तो ह्याला बधला नव्हता. तो अजूनही तिच्यासाठीच झुरत होता.

पण थोडेच दिवसात नोकरीनिमित्त त्याला दुसरीकडे जावं लागलं. आता तर सगल्यागोष्टी अजूनच अवघड व्हायला लागल्या होत्या. आता रोज भेटता येणार नव्हत, मनातलं समोरासमोर बसून बोलता येणार नव्हतं, ते डोळ्यात डोळे घालून फक्त शांतता अनुभवणं होणार नव्हतं. संपर्काची साधनं कितीही वाढली तरी भेटण्याची एक वेगळीच ओढ असते, तो मोह कायमचा असतो.

Whatsapp आहे, Video Calling आहे, काही नाही तर फोन करून बोलता येतं. पण ते रोजच चाललंय ओ. या  long distance मध्ये बोलण्याचा मोह टाळता येत नाही. पण सारखं सारखं बोलणार तरी काय? सगळाच अतिरेक नुसता. त्या पेक्षा Old Style पत्र व्यवहार बरा. त्यात विरहाच्या अगदी उत्कट भावना ओतल्या जायच्या. नाहीतर काही दिवसांनी हे बोलणं म्हणजे नुसतं पाट्या टाकणं होऊन जातं. भेटण्याची खरी मज्जा ह्यामुळेच. दिवसाच्या शेवटी आपल्या प्रिय व्यक्ती भेटणारच हे नक्की माहिती असल्यामुळे दिवसभराचा पसारा मनात साठवता येतो.संध्याकाळी भेटल्यावर मात्र सगळा पसारा आपण त्या व्यक्तीपुढे मांडतो; काय सांगू अन काय नको असं होऊन जातं. नात्यातला जिवंतपणा टिकून राहतो. पत्र पण लांबून हाच जिवंतपणा किती सहजपणे टिकवतात!

त्यांच्या पण long distance मध्ये आता नेहेमीचेच प्रॉब्लेम यायला चालू झालं होतं. Reply वेळेवर न येणं, Reply च ण येणं, फोन केल्यावर बोलण्याच्या ऐवजी नुसतीच भांडणं. दिवसभर कामचा वैताग, त्यात तिच्याशी बोलता पण येत नाही, अजून वैताग. आजूबाजूच्यांच आताशा खरं वाटायला लागलं होतं, पण आतून मात्र अजून तो तसाच होता, भोळा, निरागस. मनात मात्र एक द्वंद्व चालू झालं होतं. काय खरं? काय खोटं? त्याला काहींही कळेनासं झालं होतं. संशयाने मनात जागा घेतली होती. कामाच्या नादात तिच्याकडे आपण दुर्लक्ष व्हायला लागलं होतं.

तिकडे तिची पण अवस्था वेगळी नव्हती. प्रत्येक वेळी काय reply द्यायचा ह्याचा विचार करून तिच्या डोक्याचा पार भुगा झाला होता. हा पण रोज तेच प्रश्न विचारतो राव, आता नवीन काय सांगायचं? रोजच जेवते मी, रोजच बरी असते; अजून काय नवीन घडणार आहे रोज? त्यामुळे तिने त्याला असल्या फालतू प्रश्नांवर reply देणंच सोडून दिलं होतं. तिचा स्वभावाच तसा होता. सरळ, शांत, थोडासा एकलकोंडा. पण स्वतःच्या स्वभावाला मोडता घालून ती त्याच्याशी बोलायची खूप वेळ, त्याला सगळं सांगायची. पण तिला आता ह्याचा कंटाळा यायला लागला होता. तिच्या आत स्वतःसोबत एक वेगळंच द्वंद्व चालू झालं होतं. त्यात हा नेमका झोपायच्या वेळेला मेसेज करणार, ती पण दमलेली असायची, प्रत्येक वेळी रिप्लाय देणं तिला पण शक्य नव्हतं. त्यामुळे आता फोनवर पण ती त्याला टाळायला लागली होती.

ह्या सगळ्यातच फोनवर बोलणं झालं कि संवादाच्या ऐवजी व्हायचं ते फक्त भांडण. संवाद हरवला होता.

आता मात्र पाणी डोक्यावरून चाललं होतं. आता तिच्या स्वभाने मनावर अधिराज्य करायला सुरुवात केली होती. तिचा विचार आता पक्का झाला होता. आता संपवायचं हे सगळंच, बास झालं relationship वगैरे, आता एक घाव दोन तुकडे. मन तिला थांबवत होतं, पण स्वभावाने हात नेलाच मोबाईलकडे. त्याला फोन लावला तिने. त्याने अगदी पटकन उचलला फोन. जणू तिच्या फोनची वाट बघत तो फोन हातात घेऊन बसला होता. ह्या अचानक झालेल्या गोष्टीमुळे काय सांगायचं ह्यात ती गडबडून गेली आणि तिने पटकन फोन ठेवला.

त्याने परत फोन केला, तिने उचलला नाही. मनातलं द्वंद्व आता अधिकच वाढलं होतं. फोन तसाच रूमवर ठेऊन ती विचार करायला म्हणून खाली आली. समोरच तिला तो जाताना पाठमोरा दिसला. तिच्यासाठी तो एवढ्या लांब आला होता, तिला surprise देण्यासाठी. एक क्षण तिला पण वाटलं, एक आवाज द्यावा त्याला, थांबवावं, आपलं सगळं प्रेम व्यक्त करावं. पण ह्यावेळी मनानेच एक आवाज दिला आतून, ततिने त्याला थांबवलं नाही. दोघेही आपापल्या प्रवासाला निघाले होते.


एका क्षणात जग दोघांसाठी पण बदललं होतं.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा